Thursday, June 29, 2017

उत्तर प्रदेश निवडणूक आणि मुस्लिम मतांचे गूढ


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये तीन दिवस तळ ठोकला आणि दोन रोड शो केले. या रोड शो दरम्यान मोदींना समर्थकांचा प्रचंड प्रतिसाद तर लाभलाच, परंतु मुस्लिम समुदायाकडून मिळालेला प्रतिसाद हे यावेळचे ठळक वैशिष्ट्य होते. मोदींचा ताफा मुस्लिमबहुल भागातून जात असताना मुस्लिम बांधवांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले. एकेकाळी मुस्लिम समाजाचा कट्टर वैरी अशी प्रतिमा असलेल्या मोदींना मिळालेल्या या सौहार्दयाचे अनेकजण अनेक अर्थ काढत आहेत.
देशाचा पंतप्रधान आपल्या भागातून प्रचार फेरी काढत असेल तर त्यांच्या पदाचा मान राखण्यासाठी तोंडदेखले स्वागत केले गेले आणि यापेक्षा अधिक काही अर्थ काढू नये असा एक मतप्रवाह आहे. अर्थात असे मानणे अगदीच चुकीचे नाही कारण एखाद्या समुदायाच्या मनात असलेली अढी एवढ्या सहजासहजी पुसली जाईल असा विचार करणे एक तर भाबडेपणाचे आहे अथवा मूर्खपणाचे. परंतु मोदींना मुस्लिम समाजाने अजूनही आपला शत्रूच मानले आहे असे चित्र रंगवले जाते तेही चित्र तितकेसे खरे नाही हेच यातून सिद्ध होते.

गुजरात दंग्याच्या पार्श्वभूमीवर मोदींची मुस्लिमविरोधी अशी प्रतिमा तयार करण्यात त्यांच्या राजकीय विरोधकांना आणि प्रसारमाध्यमांना मोठ्या प्रमाणात यश आले. त्यामुळे जिथे दंगे झाले त्या गुजरातमधील मुस्लिम समुदाय मोदींना काही प्रमाणात स्वीकारत असतानाही गुजरातबाहेरील मुस्लिमसमुदाय मोदींविषयी तिरस्काराच्या भावनेतूनच पाहात होता.

मोदी पंतप्रधान झाले तर अल्पसंख्यांक समाजाचे आणि त्यातही मुसलमानांचे जगणे कठीण होऊन बसेल असा प्रचार लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आता मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे होत असताना विरोधकांनी आणि प्रसारमाध्यमांनी उभा केलेला बागुलबुवा किती खोटा होता हे मुस्लिम समाजाला हळूहळू जाणवू लागले आहे. त्यामुळेच मोदींविषयी भीती बाळगणाऱ्यांनाही मोदींविषयीचे आपले मत पुन्हा तपासून पाहायला भाग पडते आहे.
सत्तेवर आल्यापासून मोदींनी “सबका साथ सबका विकास” असा नारा दिला आणि त्याबरहुकूम कामही सुरु केले. कोणाचेही लांगुलचालन नाही तसेच कोणाविषयी आकसही नाही असा साधा सोप्पा आणि सरळ मार्ग त्यांनी पत्करला. केंद्र सरकारच्या योजना आता एका विशेष समुदायाला समोर ठेऊन आखल्या जात नाहीत आणि त्या त्या योजनांचा लाभ प्रत्येक समाजातील घटकांना मिळतो आहे हे साऱ्यांनाच समोर दिसते आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहेत आणि याचा लाभ मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. कारण काँग्रेस आणि इतर तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या कृपेने मुस्लिमसमुदाय बहुसंख्येने दुर्बल राहिला आहे. आजवर केवळ संघ, भाजप, मोदी आणि इतर उजव्या विचारसरणीच्या लोकांची भीती दाखवून या पक्षांनी मुस्लिम समाजाचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला आहे.
भाजपने या निवडणुकीमध्ये ट्रिपल तलाकचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेली काही वर्षे अनेक सामाजिक संघटनांनी हा मुद्दा प्रकाशात आणला परंतु तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी या मुद्द्याला केराची टोपली दाखविली आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उपस्थित करून ५०% मस्लिम लोकसंख्येला साद घातली आहे. मुस्लिम समाजातील स्त्रियांची परिस्थिती या विषयावर चर्चा करणारे लोकही अनेकदा ट्रिपल तलाकच्या मुद्द्याला हात लावताना कचरतात. अशा वेळी भारतीय जनता पक्षाने आपली मांडलेली बाजू अनेक मुस्लिम महिलांना योग्य वाटू शकते. अर्थात मोदींच्या प्रचार फेरीचे स्वागत केले याचा अर्थ आता मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाला मतदान करेल असे मानायचे काहीही कारण नाही. परंतु मोदींना घाबरण्याची काहीही गरज नाही असा विश्वास मुस्लिम समाजामध्ये निर्माण होताना दिसतो आहे.
मोदींच्या प्रचार फेरीमधील मुस्लिमसमाजाच्या सहभागाविषयी ज्याला जे समजायचे ते समजू दे. पण “मोदी म्हणजे खलनायक” हा समज पुसला जाऊन मोदी म्हणजे केवळ हिंदूंचाच नव्हे तर आपलाही पंतप्रधान आहे ही भावना मुस्लिम समुदायात रुजू लागली असेल तर देशासाठी ही आनंदवार्ताच आहे. तसेच अनेक दशके मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात न आणता केवळ बहुसंख्य समाजाची भीती दाखवून त्यांची मते मिळवण्याचे राजकारण करणाऱ्यांना हि एक सणसणीत चपराकही आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये काय होईल हे ११ मार्च ला स्पष्ट होईलच, पण देशातील अल्पसंख्य समाज जर मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असेल तर भारताच्या सामाजिक ऐक्यासाठी एक शुभसंकेतच मानावा लागेल.
(सदर लेख marathi.rightlog.in वर मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

No comments:

Post a Comment