Tuesday, May 12, 2026

माझी सोनेखरेदी व परदेशवारी आणि जागतिक परिस्थिती

असा मी असामी मधे पु. ल. म्हणतात, "आता अणुयुद्ध टाळायचा एकमेव उपाय ठाऊक असलेला हा दत्तोबा कदम, आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीत चपराशाचं काम का करतो कुणास ठाऊक". आपला अनेकांचा सध्या दत्तोबा कदम झालाय. 

आपल्याला काही गोष्टींचा उगाचच बाऊ करायची सवय झालेली आहे. जगात कुठेही काहीही घडलं तरी त्याचा माझ्यावर कसा परिणाम होणार याविषयी जागरूक असावं पण उगाच नको इतकी चिंता आपल्याला का व्हावी?

ताजा विषय म्हणजे गेल्या दोन दिवसात नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून काही आवाहन केलं. जसं की वर्षभर तरी सोनं घेऊ नका, परदेशात फिरायला जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा, प्रवास शक्य तितका टाळा किंवा पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा, इत्यादी. यापैकी बऱ्याचशा गोष्टीशी जास्त संबंध नसताना किंवा त्याचा जास्त परिणाम होत नसताना लोक उगाचच मतप्रदर्शन करत आहेत.

पहिला मुद्दा म्हणजे एक वर्ष तरी सोनं खरेदी करू नका. माझा तसाही काही प्लॅन नव्हता. लोक तर असेही react करत आहेत, जसं दर महिन्याला सोन्याची बिस्किटे खरेदी करतात आणि आता करता येणार नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे परदेश प्रवास टाळा. २०१८ ला अमेरिकेतून भारतात जो परत आलोय, त्यानंतर मी परदेश या नावाखाली नेपाळला सुद्धा गेलो नाहीये आणि माझा प्लॅन नाहीये, मग मला याचा त्रास का व्हावा? आणि काही लोक असं react करताहेत जसं दर महिन्याला परदेशवारी करतात.

Work from home काही क्षेत्रात शक्य आहे पण काही ठिकाणी अजिबात शक्य नाही. त्या त्या क्षेत्रात तसे निर्णय होतीलच. तसा माझा स्वभावच मुळात बैठा आहे. त्यामुळे उगाच इकडेतिकडे फिरू नका याचा मला फारसा फरक पडत नाही. इथे मात्र लोकांना आपापल्या प्रवृत्तीनुसार थोडाफार फरक पडेल.

पण एखाद्या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम होणार याचा विचार न करता उगाच बोंबलत सुटायचं. आता काही गोष्टी नक्की परिणाम करतील. इंधन तुटवडा झाला तर प्रवास कठीण होतील, सार्वजनिक व्यवस्थासुद्धा बाधित होऊ शकेल. सगळ्या वस्तूंचे दर वाढतील, महागाई वाढेल. जागतिक परिस्थितीचा प्रत्येक देशावर कमी अधिक प्रमाणात परिणाम होतंच असतो. जागतिक परिस्थिती सामान्य राहिली नाही तर व्यक्तिगत जीवन देखील सामान्य राहू शकत नाही हे मान्य करायलाच पाहिजे. आणि गोष्टी सामान्य होईपर्यंत करू की सहन थोडे दिवस.

Sunday, May 10, 2026

Mid Life Crisis - उत्तरार्ध

Mid life crisis हा प्रश्न नक्की काय आहे आणि "त्याला आपलं काही उत्तर असू शकतं का?" असा विचार मी मागच्या ब्लॉगमध्ये मांडला होता. हा प्रश्न मी ब्लॉगवर जरी आठवड्याभरापूर्वी लिहिला होता, तरी तो मी माझ्या फोनमधल्या नोट्स मध्ये १३ मे २०२४ ला लिहून काढलेला होता. आज जवळपास दोन वर्षांनी त्याचं "मला वाटलेलं उत्तर" लिहायला घेतलं. अर्थात उत्तर मिळवण्याची कधी घाई सुद्धा केली नाही, त्याच्यामुळे कदाचित एवढे दिवस लागले असतील. अर्थात, मला आज जे वाटत आहे, ते त्याचं पक्कं उत्तर आहे असा माझा दावा मुळीच नाही. खरं तर की "Mid Life Crisis" हा प्रश्न आहे का, हेच मला नक्की माहित नाही. आणि प्रश्न नसेल तर त्याचा उत्तर शोधण्याचा आटापिटा कशाला? पण हा एक विचार आहे आणि त्याला उत्तर देणारा एक विचार मांडावा म्हणून आजचा हा लेखनप्रपंच.

नोकरी/व्यवसाय कंटाळवाणा झाला असला किंवा त्यातलं नाविन्य संपलं असलं तरी तो सुरू ठेवणं आवश्यक आहे. त्यावर आपला चरितार्थ सुरू असतो, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडत असतात. आणि त्याच जीवावर इतर विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं असतं. आता काम करायचंय आहे तर मग त्यात आनंद किंवा नाविन्य शोधायला शिकलं पाहिजे. आपलं काम कोणत्याही क्षेत्रात असो, त्यात नव्या गोष्टी/टेक्नॉलॉजी येतच असतात. त्याचा मागोवा घेतला पाहिजे.

मग आनंद देणाऱ्या छंदाचं काय? सोडून द्यायचा का? नाही, इथे balancing act साधायला हवा. काम करता करता छंद जोपासायचा. कधी कधी भरपूर काम असेल आणि वेळ मिळणार नाही. पण त्यावेळी त्रागा करायचा नाही. इथे old school म्हणजे जुन्या जमान्यातलं व्हायचं. वाट बघायला शिकायचं. सध्याचा वेगवान जगात हे कुठेतरी हरवत चाललं आहे. आपल्याला सगळं इन्स्टंट म्हणजे लगेच हवं असतं. मग ते नूडल्स असो की ॲप वरून ऑर्डर केलेलं साहित्य किंवा आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया. पोस्ट टाकल्यावर दर दोन मिनिटांनी "कोण काय म्हणालं" किंवा "किती लोकांनी पोस्ट लाईक केली" हे आपण चेक करतो. पण या बाबतीत हेच टाळायचं. वेळ मिळेल तसा छंद जोपासायचा.

परिस्थितीची एक चांगली गोष्ट ही आहे की ती बदलते. अजून काही वर्षांनी मुलं मार्गाला लागली की आपल्या काही जबाबदाऱ्या कमी होतील. तोपर्यंत आर्थिक परिस्थिती पण अधिक बळकट झालेली असेल. आणि मग त्यावेळी जास्त वेळ मिळेल. तेव्हा आवडीची कामे किंवा एखादा छंद जोपासणे अधिक सहजतेने शक्य होईल. आज नोकरी/व्यवसाय हा प्राधान्याचा आहे. तिथे तडजोड नको. त्यातून वेळ काढून कुटुंबासोबत, नातलग आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवून फावल्या वेळात आपल्या छंदाच्या तलवारीला धार काढणे चालू ठेवायला पाहिजे.

पुढे जाऊन आपल्याला आवडेल अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी आज एक काम न चुकता करायला पाहिजे. ते म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे. आपण तंदुरुस्त असू तरच पुढच्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे आपली नोकरी किंवा व्यवसाय "त्याला नाव न ठेवता" करणे, आपल्या माणसांच्या सोबत असणे आणि या सगळ्यात आपला छंद जपणे हे साधे धोरण आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

आमची एक मैत्रीण म्हणते, "जास्त लोड घ्यायचा नाही, साई. One day at a time." तेही खरंय म्हणा. But, it's a long way to go. घाई कशाला? पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त.

Monday, May 4, 2026

Mid Life Crisis??

Mid Life Crisis म्हणजे साधारणपणे चाळिशीच्या आसपास प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक फरकाने घडणारी एक प्रक्रिया आहे. ज्या प्रकारे आयुष्य चाललंय ते boring वाटत असतं, नवीन काहीतरी करावं असं वाटतं, पण काय करायचं हे कळत नाही. अर्थात हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येईल किंवा नाही, आला तर किती प्रमाणात येईल आणि किती काळ राहील याचं काही गणित नाहीये.

जुन्या गोष्टी म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय वगैरे अंगवळणी पडलेलं असतं, पण त्यात काही excitement राहिलेली नसते. जबाबदारीची जाणीव असल्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय चालू ठेवावे लागतात. पण त्यात पूर्वीसारखी मजा येत नाही. त्यामुळे नवीन काहीतरी करावं असं वाटतं. पण नव्याच्या मागे जायचा धीर होत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे fear of failure. आपल्या क्षेत्रात अगदी exciting नसलं तरी आपलं बरं चाललेलं असतं. एक प्रकारे बस्तान बसलेलं असतं. त्यामुळे ते सोडावं असं वाटत नाही.

मग त्यातल्या त्यात एखादा मध्यम मार्ग शोधण्याचा खटाटोप सुरू होतो. उदाहरणार्थ एखादा छंद जोपासणे, वगैरे. मग कधीकधी असं होतं की तो छंद अधिक आनंददायक वाटू लागतो. आपलं नेहमीचं काम बाजूला टाकून नवीन काही करावं अशी उर्मी मनात उचंबळून येते. पण..... पण इथेच खरी मेख आहे. कारण आपला छंद आपल्या भावनिक गरजा पूर्ण करेलही, पण तो आपल्या दैनंदिन आर्थिक गरजा भागवण्यासाठी समर्थ नसतो. त्यामुळे चालू नोकरी किंवा व्यवसाय सुरू ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

त्यामुळे धड इकडेही नाही आणि तिकडेही नाही अशी त्रिशंकू अवस्था होते. अशा अवस्थेत काय करता येईल?

To be continued...