सुब्रमनियन स्वामी हे एक गूढ अनाकलनीय व्यक्तिमत्व आहे आणि सध्या तामिळनाडूमध्ये चाललेल्या सत्तानाट्याला बऱ्याच अंशी तेच कारणीभूत आहेत.
१९९१ ते १९९६ या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा (Disproportionate Assets) आरोप करीत सुब्रमनियन स्वामींनी जयललितांवर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला भरला. १८ वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल सप्टेंबर २०१४ मध्ये लागला तेव्हा जयललिता तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. जयललिता, त्यांची मैत्रीण शशिकला आणि इतर ३ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले. जयललितांना १०० कोटी रुपये दंड आणि ४ वर्षे कैदेची शिक्षा झाली तर इतर चौघांना प्रत्येकी १० कोटी रुपये दंड आणि ४ वर्षे कैदेची शिक्षा सुनावली गेली. याचा परिपाक म्हणून जयललितांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि त्यांनी ओ पन्नीरसेल्वम यांना रबरस्टॅम्प मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री असले तरी सगळा कारभार अम्माच चालवणार हे गृहीतच होते.
विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध जयललितांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केले आणि मे २०१५ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने जयललिता आणि बाकीच्या चौघांनाही दोषमुक्त केले. पन्नीरसेल्वम यांनी आज्ञाधारकपणे मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जयललिता पुन्हा एकदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.न्यायालयाच्या याच निर्णयाचा फायदा घेत त्यांनी आपल्यासाठी सहानुभूतीची लाट तयार केली आणि याच लाटेवर स्वर होत २०१६ मध्ये तामिळनाडूची सत्ता पुन्हा एकदा काबीज केली.
सुब्रमनियन स्वामींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याच दरम्यान सप्टेंबर २०१६ मध्ये जयललितांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवत आपल्या खात्यांचा कार्यभार ओ पन्नीरसेल्वम यांच्याकडे अधिकृतपणे दिला.
५ डिसेंबर २०१६ ला जयललिता यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच रात्री ओ पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इथेच तामिळनाडूच्या राजकारणातील वाद चव्हाट्यावर यायची सुरुवात झाली.
शशिकला या जयललितांच्या खास मर्जीतील व्यक्तींपैकी एक होत्या. अम्मांच्या राजकारणावर शशिकलांचा पगडा होता. २०११ साली दगा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत जयललितांनी शशिकला यांना सहकुटुंब बाहेरचा रास्ता दाखवला होता. पुढे वर्षभरातच अम्मांची सपशेल माफी मागत शशिकलांनी पुन्हा एकदा पक्षात आणि जयललितांच्या घरात प्रवेश केला आणि आपले वर्चस्व पुनःप्रस्थापित केले. जयललितांच्या अखेरच्या काळात शशिकलांनी इतर कोणालाही अम्मांच्या संपर्कात येऊ दिले नाही आणि जयललिता आणि बाहेरील जग यांमध्ये एक भिंतच उभी केली. यातूनच अनेकांना त्यांच्याविषयी संशय वाटू लागला.
जयललितांच्या मृत्यनंतर पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले असले तरीही शशिकलांनी पक्षाच्या सरचिटणीसपदावर आपली वर्णी लावून आपणच पक्षाच्या सर्वेसर्वा असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी २०१७ मध्ये सुब्रमनियन स्वामींनी सर्वोच्च्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर निकाल अपेक्षित असल्याने शशिकला अस्वस्थ झाल्या आणि त्यांना निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री होण्याचे वेध लागले. त्यांनी पन्नीरसेल्वम याना तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडले. जयललितांचे विश्वासू असणाऱ्या पन्नीरसेल्वम यांना हे जिव्हारी लागले. अम्मांविषयी असणारा आदर त्यांच्या मैत्रिणीविषयी असण्याचे काहीच कारण नव्हते आणि म्हणूनच जयललितांच्या समाधीच्या साक्षीने पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले.
हा डाव पूर्णपणे शशिकलांच्या ताब्यात होता आणि त्यांनी तो घाई करून घालवला असेच म्हणावे लागेल. पन्नीरसेल्वम हा काही फार मोठा जनाधार असलेला नेता नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू दिले असते तरीही तुरुंगात गेल्यानंतरही आपल्याला हवा तसा कारभार शशिकला करू शकल्या असत्या. पण तेवढा आत्मविश्वास नसल्यानेच शशिकलांनी आततायी निर्णय घेतले आणि होत्याचे नव्हते केले. पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपद अम्माकृपेने मिळाले होते आणि शशिकलांनी ते काढून घेतले. आता पन्नीरसेल्वम यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने त्यांना लढाईचे भय उरले नाही आणि ते उघडपणे मैदानात उतरले.
१४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना दोषी मानून शिक्षा सुनावली. त्याचसोबत पुढील १० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. आता आपली राजकीय इनिंग सुरु होताच संपताना पाहून शशिकला यांनी लगोलग मोहरे हलवायला सुरुवात केली. ओ पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या १९ समर्थकांना पक्षातून बाहेर काढून पलानिस्वामी यांना विधानसभेचा पक्षनेता नियुक्त केले. आता पलानिस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली.
एकाच वेळी अनेकजणांना शिंगावर घेणे ही सुब्रमनियन स्वामींची प्रवृत्ती आहे. जयललितांवरील खटला चालू असतानाच स्वामींनी 2-G, National Herald, अयोध्या राममंदिर खटला इत्यादी अनेक हाय प्रोफाइल खटले सुरु केले. जयललिता खटल्यात २० वर्षे परिश्रम करून दोषी असलेल्यांना शिक्षा झाल्यावर सुब्रमनियन स्वामी नक्कीच थांबणार नाहीत. निकालानंतर स्वामींनी केलेले ट्विट त्यांच्या पुढील लढाईबद्दल सूचना देत आहे.
@Swamy39: After 20 years I won. Now turn of TDK Buddhu PC BC & Tata to join in jail
अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी, पी चिदंबरम, कार्तिक चिदंबरम आणि रतन टाटा या मंडळींनी आपापले देव पाण्यात घालून बसायला हरकत नाही.
(सदर लेख marathi.rightlog.in वर फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकाशित झालेला आहे)

No comments:
Post a Comment