Thursday, August 3, 2023

नाटक असं असतं, राजा


               गेले तीन महिने एक नाटक उभं करण्याचा प्रयत्न झाला. सात पात्र असलेलं नाटक. सुरवातीच्या सात जणांच्या संचातील काही लोक आपापल्या वैयक्तिक कारणाने बाहेर पडले. त्यांना पर्यायी लोक उभे करून नाटक बसवून जवळपास तयार झालं. कोणी आपल्या ओळखीचे लेखक, दिग्दर्शक आणले, टीम तयार केली, कोणी दुसऱ्या शहरातून पुण्यात येऊन राहिलं, कोणी आपापल्या नोकऱ्यांमधून वेळ काढून नाटकाला वेळ दिला, कोणाची आर्थिक बाजू फारशी मजबूत नसताना देखील नाटकासाठी पैसे उभे केले. सगळ्यांनीच खूप कष्ट घेतले. 

              या तीन महिन्यात नाटकाची प्रक्रिया खूप काही देऊन गेली. तालमीत मिळणारा आनंद, नियोजनाची विविध अंग, नव्या नव्या हौशी कलाकारांची ओळख झाली, खूप शिकता आलं. पण दुर्दैवाने नाटक पहिल्या प्रयोगाआधी बंद करावं लागलं. आमच्या ग्रुप मध्ये सगळी नट मंडळी असल्यामुळे लेखक, दिग्दर्शक आणि इतर तांत्रिक बाजू आम्हाला outsource कराव्या लागल्या.

अर्थात, या तीन महिन्यात नाटक उभं करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी खूप शिकता आलं. त्यापैकी काही गोष्टी नव्याने हौशी नाटक करू पाहणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी.


१. समूहनीती - नाटक हे सांघिक काम आहे. त्यामुळे नाटकाच्या टीम मध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर असला पाहिजे हा शिकवलेला पहिला पाठ कधीही विसरून चालणार नाही. 

२. नाटकाचा किडा हा अंगतल्या इतर कोणत्याही किड्यापेक्षा मोठा असेल तरच हौशी नाटक उभं राहू शकतं.

३. नाटक हौशी असेल तरीही त्यात शिस्त असणे गरजेचे आहे. तालमीच्या वेळा पाळणे आणि आपापली तयारी करून येणे या अगदीच प्राथमिक अपेक्षा आहेत.

४. नव्याने नाटक करणाऱ्या नटांमध्ये नाराजीचे कारण ठरणारी एक प्रमुख गोष्ट म्हणजे भूमिकेची लांबी, तिचे महत्व आणि त्या पात्राला मिळणाऱ्या वाक्यांची संख्या. एका नाटकात सहा-सात पात्र असतील, तर प्रत्येक भूमिका सारखीच महत्वाची किंवा सारख्याच लांबीची कशी असेल? अंतू बर्वा नाही का सांगत? "अहो, आंब्याचे एक पानदेखील नसते दुसऱ्यासारखे, सगळ्यांची नशीबे सारखी होतील कशी?" आपल्याला मिळालेली भूमिका पूर्ण प्रयत्न करून उत्तमरीत्या वठवणे हे नटाचे कर्तव्य आहे.

५. हौशी नाटकाचं आर्थिक नियोजन करत असताना एकूण खर्चाचा अंदाज काढणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण प्रत्येकजण आपल्या खिशातून पैसे खर्च करून नाटक करत असतो.

६. दिग्दर्शन, संगीत संयोजन, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि इतर तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या लोकांशी आर्थिक बाबी स्पष्ट बोलून घेणे आवश्यक आहे. एकूण रक्कम, किती टप्प्यात आणि नाटकाच्या कोणत्या टप्प्यावर दिली जाणार याविषयी कमालीची स्पष्टता आवश्यक आहे. त्याचसोबत या सर्व तांत्रिक बाबी तालमीच्या कोणत्या टप्प्यावर आणि किती प्रमाणात वापरता येतील याविषयी स्पष्टता असणे आवश्यक आहे.

७. कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा नाटक मोठं आहे हे प्रत्येकाने समजून घेणे सर्वात महत्वाचा भाग आहे. हौशी नाटक करताना प्रत्येकाने सारखाच खर्च केलेला असतो त्यामुळे प्रत्येकाला तेवढेच महत्त्व असते, त्यामुळे नाटकाची जबाबदारीही सगळ्यांची सारखीच असते हे प्रत्येकाच्या मनात ठसवणे महत्त्वाचे आहे. 

८. एखाद्या भूमिकेचा आपला अभ्यास आणि दिग्दर्शकाचे मत यात तफावत असेल तर चर्चा करावी. मनात कुढत राहून दिग्दर्शकाने सांगितलेले follow करू नये. दोन्ही प्रकारे करून पहावे आणि सर्वानुमते जे अधिक चांगले असेल ते करावे. 

९. दिग्दर्शकाचे काम केवळ नाटक बसवणे एवढेच नाही. तो या जहाजाचा कॅप्टन आहे. सगळी टीम बांधून ठेवण्याची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे.

१०. नाटकाची चर्चा सुरू झाल्यापासून पहिला प्रयोग लागेपर्यंतची प्रक्रिया शक्यतो सलग असावी. त्यात खंड पडला की त्याला अनेक फाटे फुटत जातात.

११. लेखकाने लिहून दिलेलं आणि दिग्दर्शकाने बसवलेलं नाटक करावं. त्यात संगीत मानापमान चे अंक घुसवू नयेत.

१२. हौशी नाटक करताना सगळ्यांनाच अभिनयाव्यतिरिक्त अनेक कामं करावी लागतात. मी फक्त अभिनय करेन आणि बाकी काही करणार नाही ही मुभा इथे नसते. तरीही शक्य असेल तर सर्वानुमते एक माणूस नेमावा. त्याला तुम्ही Production  Manager म्हणा किंवा coordinator. पण असा एक जण अधिकारवाणीने काही सांगणारा व्यक्ती असणे आवश्यक आहे.  असा मी असा मी मधे बेंबट्या जोश्यांचे वडील त्यांना सांगत असत ना, "आमच्या देशातल्या लोकांच्या ढुंगणावर सदैव हंटर हवा, हंटर. काय समजलास बेंबट्या?"

आत्तापर्यंत एवढ्या गोष्टी सुचल्या आहेत. या अनुभवाची शिदोरी घेऊन पुढे जायचं.

नाटक करायचं म्हणजे एक गुंतवणूक असते. मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक अशा अनेक प्रकारची. कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सुटली तर दुःख होतंच . पण,  जो बीत गई सो बात गई। 

पुनश्च हरि ॐ

2 comments:

  1. खुपच सुंदर मुद्दे उपस्थित केले असून प्रत्येक नवोदित कलाकाराने वरील सगळे मुद्दे आत्मसात करून अंगीकारणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुठलंही नाटक उभं राहणं शक्यच नाही. माणसाला एखादं व्यसन असलं तर त्यासाठी तो काहीही म्हणजे अगदी काहीही करायला तयार असतो . अगदी तसंच हौशी नाटकांसाठी काहीही करावं लागतं. प्रत्येक कलाकारांची ही मानसिकता असावीच लागते. नाटकात सहभागी होणाऱ्या कलाकारांकडे मुळात संयम हवा. कारण हौशी नाट्य उभं राहणं म्हणजे तारेवरची कसरत असते. ज्याच्याकडे संयम आहे तोच इथे टिकू शकतो. साईप्रसाद , तुम्ही लेखात नमूद केल्याप्रमाणे किडा जो आहे. तो कधीच थंड पडला नाही पाहिजे. जोपर्यंत प्रयोग होत नाही तोपर्यंत तो कायम वळवळतच राहिला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे नाटक ही संकल्पना मुळापासून समजून उमजून घेतली पाहिजे. ज्याला नाटक कळतं तो नाटक उभं राहण्यापर्यंत काहीच नाटकं न करता नाटक करतो आणि तेही यशस्वीरित्या.

    साईप्रसाद, पुढील वाटचालीस आपणांस खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद.

    ReplyDelete