चौथा महत्वाचा पक्ष आहे काँग्रेस. हल्लीच्या काळात काँग्रेसबद्दल जे आधी सांगून झालं नाही असं काहीही नव्याने सांगता येत नाही. हा पक्ष नित्यनेमाने त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत आला आहे. ७० जागा लढवून त्यांना केवळ १९ जिंकता आल्या. खऱ्या अर्थाने तेजस्वी यादवच्या स्वप्नांना धुळीत मिळवण्याचे कार्य काँग्रेसने केले आहे. ज्याने काँग्रेसला सोबत घेतले त्याची नौका बुडाली हे जणू समीकरणच झाले आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश असो नाहीतर बिहारमध्ये तेजस्वी. केवळ एक राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून काँग्रेसला जास्त जागा दिल्या गेल्या. अर्थात ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या तिथे जिंकण्यासाठी कमी वाव होता हे मान्य करावे लागेल. पण काँग्रेस कुठेही स्पर्धा करण्याचा मूडमध्ये दिसत नाही. कोणाच्यातरी आधाराने निवडणुका लढवाव्यात, हाती लागेल ते मिळवावे आणि मिळेल ते मिरवावे एवढे एक धोरण या पक्षाने अवलंबिले आहे.
"कर्तृत्वशून्य, नियोजनशून्य व ध्येयहीन नेतृत्व जितक्या लवकर बदलले जाईल तेवढे काँग्रेससाठी हितकारक असेल."
बिहारचा आणखी एक पक्ष म्हणजे लोकजनशक्ती पार्टी. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचं निधन झालं. हा पक्ष केंद्रात NDA सोबत आहे. पण राज्यात केवळ नितीश कुमार नको अशी भूमिका घेऊन वेगळा लढला. १३४ जागा लढून साडेपाच टक्क्याहून अधिक मते मिळाली पण केवळ एक जागा जिंकता आली. अर्थात चिराग पासवान या निवडणुकीत खूप जागा मिळतील या उद्देशाने उतरले असतील असे कोणी म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही. केवळ नितीश कुमारांना अपशकुन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते आणि त्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. अर्थात आपण किंगमेकर ठरावे आणि NDA ला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नितीश कुमारांऐवजी दुसरा कोणी मुख्यमंत्री करण्याची मागणी करावी हा त्यांचा मूळ मनसुबा असावा. पण तशी काही वेळ आली नाही. पण नितीश कुमारांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला यात चिराग पासवान समाधानी असतील. जर खरंच ही नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असेल तर त्यांच्या नंतर जी पोकळी तयार होईल त्यात आपले अस्तित्व शोधण्याचा ते प्रयत्न करतील. तेजस्वीप्रमाणेच चिरागदेखील तरुण आहेत आणि वय त्यांच्या बाजूने आहे.
बिहारच्या या पाच पक्षांव्यतिरिक्त डावे पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी याच्या AIMIM या दोन पक्षांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीमध्ये सामील असलेल्या डाव्या पक्षांनी २९ जागा लढवून १६ जागी यश संपादन केले आहे. गेल्या निवडणुकीतील ३ वरून या निवडणुकीत १६ पर्यंत घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. परंतु राष्ट्रीय राजकारणात ज्या वेगाने डाव्यांचे पतन होताना दिसते ते पाहता या यशाचा फार मोठा अर्थ काढता येत नाही. ओवैसींच्या AIMIM ने २० जागा लढवून पाच जागी विजय मिळवला आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये त्यांचे हे यश मुस्लिम मतदारांचा कल दाखविणारे आहे. अशा मतदारसंघांमध्ये मुस्लिमहिताची काळजी करणारे आक्रमक मुस्लिम नेतृत्व हे मुस्लिमहिताची काळजी असल्याचे दाखवणाऱ्या बिगर-मुस्लिम नेतृत्वापेक्षा मतदारांना अधिक जवळचे वाटले. अर्थात, धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करून भाजपाला जिंकण्यासाठी हातभार लावल्याचे आरोप त्यांच्यावर याही निवडणुकीत झाले. पण आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी आपण कुठे आणि किती जागा लढवाव्यात याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. शिसेनेनेदेखील बिहारमध्ये २२ जागा लढवल्या. अर्थात सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आणि २२ पैकी २१ ठिकाणी तर NOTA पेक्षाही कमी मते मिळाली आहेत असं वाचलं. बिहारमध्ये २२ जागी लढून ०.०५% मतं मिळवून शिवसेनेने काय साधलं देव जाणे. पण हा ज्या त्या पक्षाच्या विचार आणि निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.
विविध पक्षांच्या यशापयशाचा विचार थोडा बाजूला ठेऊन निवडणूक आयोग, सरकारी/प्रशासनिक यंत्रणा आणि विविध राज्यातील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. कोरोना सारख्या संकटाच्या काळात देखील आपल्या लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी या साऱ्यांनी जे प्रयत्न केले ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चाललेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक प्रक्रियेचे यश अधिकच अधोरेखित होत आहे. निवडणुका होत राहतील, हार-जीत होत राहील, आज जो सत्तेत आहे तो उद्या विरोधात बसेल आणि आजचा विरोधक उद्या कदाचित सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होईल. वेळोवेळी येणाऱ्या संकटांवर मात करत हे चक्र चालू राहिलं पाहिजे. आणि गेला महिनाभर चाललेल्या प्रक्रियेने हेच दाखवून दिलं आहे.



छान विश्लेषण!
ReplyDeleteमस्त लिहिलाय. मुद्देसूद !
ReplyDeleteछान ! मोजक्या शब्दांत योग्य विश्लेषण !!!
ReplyDelete