Wednesday, November 11, 2020

बिहार मे का बा?


कोरोनाच्या सावटाखाली निवडणुका घेता येतील की नाही अशी शंका वाटत असतानाही बिहारच्या निवडणुका घ्यायचा निर्णय झाला. निवडणूक आयोगाने उत्कृष्ट कार्यक्षमतेचे उदाहरण प्रस्तुत करत त्या पार पाडून दाखवल्या. याबद्दल सर्वप्रथम निवडणूक आयोगाचे कौतुक केले पाहिजे. निवडणूक जाहीर झाल्यावर "बिहार मे का बा?" हा प्रश्न विचारला जाऊ लागला. काल निकाल लागल्यावर या बहुचर्चित निवडणुकांचं सूप वाजलं. अतिशय अटीतटीची लढत झाली आणि अखेरीस नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ने आपली सत्ता राखली. आता निकाल स्पष्ट झाल्यावर कोणी काय कमावलं आणि कोणी काय गमावलं याची गणितं मांडायची वेळ आली आहे.
 


"या निवडणुकीत सगळ्यात जास्त कोणी कमावलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने कमावलं आहे"

भाजपाने बिहारमध्ये आजवरचे सगळ्यात चांगले प्रदर्शन केले आहे. नितीश कुमारांच्या JDU पेक्षा मोठ्या संख्येने जागा जिंकत NDA मध्ये आपणच मुख्य पक्ष आहोत हे भाजपने प्रस्थापित केले आहे. प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असतो. बिहारमध्ये भविष्यात स्वबळावर सत्ता काबीज करायची हे भाजपचे उद्दिष्ट असेल तर त्या दृष्टीने आजचा विजय हे महत्वाचे पाऊल ठरेल. निकाल जाहीर होताच भाजपमधील काही उत्साही लोकांनी आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी मते व्यक्त केली आहेत, पण सध्याच्या घडीला ते होणे शक्य नाही. आपल्या गृहराज्यात अतिशय प्रभावी कामगिरी करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगात प्रकाश नड्डा हे देखील अमित शहांच्या सावलीतून बाहेर पडून आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. बिहारसोबत इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाला चांगले यश मिळालेले दिसते. मध्य प्रदेशात २८ पैकी १९ जागा जिंकत भाजपने आपले बहुमत अधिक भक्कम केले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या ८ पैकी ८, कर्नाटकच्या २ पैकी २, उत्तर प्रदेशच्या ७ पैकी ६, मणिपूरच्या ५ पैकी ४ आणि तेलंगणातील एकमेव जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. बिहार विधानसभा आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकीतील या निकालामुळे भाजपाला येत्या सहा महिन्यात होऊ घातलेल्या बंगालच्या निवडणुकीत अधिक जोमाने काम करता येईल.

जनता दल युनाइटेड या पक्षाच्या दृष्टीने कालचे निकाल काहीसे मिश्र स्वरूपाचे म्हणता येतील. सत्ता कायम राहिली  याचा आनंद आहे परंतु सत्ताधारी गोटात आपल्यापेक्षा मोठा पक्ष असल्याचे दडपण नितीशकुमारांच्या मनावर नेहमीच राहील. अशा पद्धतीत सरकार चालवण्याचा त्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. परंतु दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने राष्ट्रीय जनता दलापेक्षा भाजप हा सुसह्य पर्याय असेल. "अंत भला तो सब भला" असं म्हणून आपल्या शेवटच्या निवडणुकीत मतदारांना साद घालणाऱ्या नितीशकुमारांना स्वतःच्या मनालादेखील "अंत भला तो सब भला" असं म्हणत पुढची पाच वर्षे काढावी लागतील. अर्थात राजकारण हा शक्याशक्यतांचा खेळ आहे आणि आजचे मित्र उद्या मित्रच राहतील याची खात्री कोणी द्यावी? पंधरा वर्षे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांबद्दल जनतेत काहीशी नाराजी पाहायला मिळाली आणि नितीश हे जाणून असतील. पण जनता दल युनाइटेड मध्ये नितीशकुमारांशिवाय दुसरा चेहरा नाही आणि नितीश आता फार मोठे धाडस करतील असे मला तरी आजच्या घडीला वाटत नाही. 

राष्ट्रीय जनता दलाच्या दृष्टीने ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची ठरली. तेजस्वी यादव या युवा नेत्याने पक्षामध्ये आपले निर्विवाद नेतृत्व सिद्ध केले आहे. याआधी मुख्यमंत्री राहिलेले आई आणि वडील, तसेच स्पर्धा करू पाहणारा भाऊ तेजप्रताप यांना बाजूला ठेवून त्याने पक्ष आपल्या अमलाखाली आणला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचारात कुठेही लालूप्रसाद यादव यांच्या फ़ोटोचाही वापर केले गेला नाही. अर्थात चारा घोटाळ्यात आरोप सिद्ध झाल्याने ते आज तुरुंगात आहेत म्हणूनही असेल कदाचित. काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी करून या विरोधी आघाडीचा नेता म्हणून तेजस्वीने खूप कष्ट केले. पक्षाला सत्ता मिळवण्यात यश आले नसले तरीही विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून निडवून येणे हेदेखील दखलपात्र आहे. पंधरा वर्षाची Anti-incumbency असताना, काँग्रेस आणि डावे यांची मोट बांधूनही सत्तापालट करता आला नाही याबद्दल अनेकजण टीकाही करतील. पण माझ्या मते तेजस्वी यादव यांनी वडिलांच्या छत्राखाली न राहता आपण पक्ष सांभाळू शकतो हे आज दाखवून दिले आहे.  आज हा नेता अवघ्या ३१ वर्षाचा आहे. वय त्याच्या बाजूने आहे. येणाऱ्या काळात हा नेता काय करू शकेल हे आजच कोणी सांगावे?

चौथा महत्वाचा पक्ष आहे काँग्रेस. हल्लीच्या काळात काँग्रेसबद्दल जे आधी सांगून झालं नाही असं काहीही नव्याने सांगता येत नाही. हा पक्ष नित्यनेमाने त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत आला आहे. ७० जागा लढवून त्यांना केवळ १९ जिंकता आल्या. खऱ्या अर्थाने तेजस्वी यादवच्या स्वप्नांना धुळीत मिळवण्याचे कार्य काँग्रेसने केले आहे. ज्याने काँग्रेसला सोबत घेतले त्याची नौका बुडाली हे जणू समीकरणच झाले आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश असो नाहीतर बिहारमध्ये तेजस्वी. केवळ एक राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून काँग्रेसला जास्त जागा दिल्या गेल्या. अर्थात ज्या जागा काँग्रेसला मिळाल्या तिथे जिंकण्यासाठी कमी वाव होता हे मान्य करावे लागेल. पण काँग्रेस कुठेही स्पर्धा करण्याचा मूडमध्ये दिसत नाही. कोणाच्यातरी आधाराने निवडणुका लढवाव्यात, हाती लागेल ते मिळवावे आणि मिळेल ते मिरवावे एवढे एक धोरण या पक्षाने अवलंबिले आहे. 

"कर्तृत्वशून्य, नियोजनशून्य व ध्येयहीन नेतृत्व जितक्या लवकर बदलले जाईल तेवढे काँग्रेससाठी हितकारक असेल."


बिहारचा आणखी एक पक्ष म्हणजे लोकजनशक्ती पार्टी. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचं निधन झालं. हा पक्ष केंद्रात NDA सोबत आहे. पण राज्यात केवळ नितीश कुमार नको अशी भूमिका घेऊन वेगळा लढला. १३४ जागा लढून साडेपाच टक्क्याहून अधिक मते मिळाली पण केवळ एक जागा जिंकता आली. अर्थात चिराग पासवान या निवडणुकीत खूप जागा मिळतील या उद्देशाने उतरले असतील असे कोणी म्हणत असेल तर ते योग्य ठरणार नाही. केवळ नितीश कुमारांना अपशकुन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते आणि त्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वी ठरले आहेत. अर्थात आपण किंगमेकर ठरावे आणि NDA ला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नितीश कुमारांऐवजी दुसरा कोणी मुख्यमंत्री करण्याची मागणी करावी हा त्यांचा मूळ मनसुबा असावा. पण तशी काही वेळ आली नाही. पण नितीश कुमारांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला यात चिराग पासवान समाधानी असतील. जर खरंच ही नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असेल तर त्यांच्या नंतर जी पोकळी तयार होईल त्यात आपले अस्तित्व शोधण्याचा ते प्रयत्न करतील. तेजस्वीप्रमाणेच चिरागदेखील तरुण आहेत आणि वय त्यांच्या बाजूने आहे.

बिहारच्या या पाच पक्षांव्यतिरिक्त डावे पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी याच्या AIMIM या दोन पक्षांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीमध्ये सामील असलेल्या डाव्या पक्षांनी २९ जागा लढवून १६ जागी यश संपादन केले आहे. गेल्या निवडणुकीतील ३ वरून या निवडणुकीत १६ पर्यंत घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. परंतु राष्ट्रीय राजकारणात ज्या वेगाने डाव्यांचे पतन होताना दिसते ते पाहता या यशाचा फार मोठा अर्थ काढता येत नाही. ओवैसींच्या AIMIM ने २० जागा लढवून पाच जागी विजय मिळवला आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये त्यांचे हे यश मुस्लिम मतदारांचा कल दाखविणारे आहे. अशा मतदारसंघांमध्ये मुस्लिमहिताची काळजी करणारे आक्रमक मुस्लिम नेतृत्व हे मुस्लिमहिताची काळजी असल्याचे दाखवणाऱ्या बिगर-मुस्लिम नेतृत्वापेक्षा मतदारांना अधिक जवळचे वाटले. अर्थात, धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करून भाजपाला जिंकण्यासाठी हातभार लावल्याचे आरोप त्यांच्यावर याही निवडणुकीत झाले. पण आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी आपण कुठे आणि किती जागा लढवाव्यात याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. शिसेनेनेदेखील बिहारमध्ये २२ जागा लढवल्या. अर्थात सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आणि २२ पैकी २१ ठिकाणी तर NOTA पेक्षाही कमी मते मिळाली आहेत असं वाचलं. बिहारमध्ये २२ जागी लढून ०.०५% मतं मिळवून शिवसेनेने काय साधलं देव जाणे. पण हा ज्या त्या पक्षाच्या विचार आणि निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.

विविध पक्षांच्या यशापयशाचा विचार थोडा बाजूला ठेऊन निवडणूक आयोग, सरकारी/प्रशासनिक यंत्रणा आणि विविध राज्यातील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. कोरोना सारख्या संकटाच्या काळात देखील आपल्या लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी या साऱ्यांनी जे प्रयत्न केले ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. अमेरिकेत  राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चाललेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक प्रक्रियेचे यश अधिकच अधोरेखित होत आहे. निवडणुका होत राहतील, हार-जीत होत राहील, आज जो सत्तेत आहे तो उद्या विरोधात बसेल आणि आजचा विरोधक उद्या कदाचित सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होईल. वेळोवेळी येणाऱ्या संकटांवर मात करत हे चक्र चालू राहिलं पाहिजे. आणि गेला महिनाभर चाललेल्या प्रक्रियेने हेच दाखवून दिलं आहे.

3 comments:

  1. मस्त लिहिलाय. मुद्देसूद !

    ReplyDelete
  2. छान ! मोजक्या शब्दांत योग्य विश्लेषण !!!

    ReplyDelete