Tuesday, October 24, 2017

देणे ब्लूमिंग्टनचे

IT क्षेत्रात काम करत असणाऱ्या अनेकांच्या पायाला भिंगरी लागलेली असते, तशीच माझ्याही पायाला लागली आणि गेल्या १०-१२ वर्षात अनेक ठिकाणी वास्तव्य करायचा योग्य आला. साधारण वर्षभर वास्तव्य केल्यावर एखादे शहर सोडताना लागणारी हुरहूर तशी सवयीचीच. पण यावेळची गोष्ट जरा निराळी होती.  ब्लूमिंग्टनने आम्हाला एवढं भरभरून दिलं की हे छोटंसं गाव आपल्याला निरोप घेताना एवढं रडवेल अशी कल्पनाही मी केली नव्हती.

२०१६ च्या जून मध्ये माझा कॅन्ससमधील ओव्हरलॅन्ड पार्क मधला प्रोजेक्ट संपला आणि मग नेहमीप्रमाणेच नवा प्रोजेक्ट, नवं शहर, नवे लोक अशा सगळ्या नव्या गोष्टीसाठी आम्ही तयार झालो. लवकरच समजलं की आता आपला नवा पत्ता ब्लूमिंग्टन असणार आहे. फिरण्यासाठी शिकागोला गेलो असता, शिकागोहून ओव्हरलॅन्ड पार्कला परत येताना आम्ही वाटेत ब्लूमिंग्टनला भेट दिली आणि हे शहर नसून एक लहानसं गाव आहे अशीच आमची पहिली प्रतिक्रिया झाली. पण पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून आम्ही ठरल्याप्रमाणे जुलै २०१६ मध्ये ब्लूमिंग्टनला राहायला आलो.

पण आमचे सगळे अंदाज चुकवणारं हे गाव निराळंच होत. या गावाने आम्हाला अगदी अलगद जवळ केलं आणि आल्यापासून तिसऱ्याच दिवशी आम्ही मराठी मंडळाच्या परिवारात सामील झालो. गणेशोत्सवात लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या मीटिंगपासून सुरु झालेला हा प्रवास मग एकामागोमाग एक नवे अनुभव देत गेला. गौतम आणि गौरी करंदीकरांचे घर हाच ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचा पत्ता. अनेक गोष्टी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा करत होतो आणि या सगळ्यातून मला माझी नवी ओळख होत गेली. मग तो ढोलपथकातला सहभाग असो नाहीतर स्किटमधे केलेली लहानशी भूमिका. स्टेजवर काम करणं हे मला इतका आनंद देऊन गेलं की आपण हे आधी का केलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा स्टेजवर काम करायला नाही म्हणायचे नाही हे मी मनोमन ठरवून टाकलं.

त्याचप्रमाणे ब्लूमिंग्टनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघाची (HSS) शाखा लागते असं समजलं आणि मी लगेच तिथेही हजेरी लावली. फार वर्षांपूर्वी शाळेत असताना मी संघाच्या शाखेत जात असे, पण ब्लूमिंग्टनमध्ये शाखेवर हजेरी लावेन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. शाखेच्या लोकांनीही मला प्रोत्साहन देत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि मी माझ्या कुवतीप्रमाणे त्या पार पाडल्या. अर्थात संघात जबाबदारी कुणा एकाची अशी नसतेच. तुमची जबाबदारी पार पाडायला प्रत्येकजण तुम्हाला मदत करतो. शाखेच्या निमित्ताने मी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालो आणि त्यामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या ज्यांचा मला आजही माझ्या नव्या जागी म्हणजे अटलांटामध्ये उपयोग होतो आहे.

दरवर्षी सादर होणारी नाटकं हे ब्लूमिंग्टनच्या मराठी मंडळाचं खास वैशिष्ट्य. गौतम करंदीकरांच्या दिग्दर्शनाखाली गेली अनेक वर्षे ही नाटकं सादर होत आली आहेत. दरवर्षीचं नाटक हे ब्लूमिंग्टनबरोबरच मिलवॉकी आणि सेंट लुई अशा दोन ठिकाणीही सादर केलं जातं. या नाटकासाठीची पात्रनिवड अतिशय गुप्त पद्धतीने होते. "आमच्या नाटकात काम करायला या होSSS" असं जाहीर आमंत्रण दिलं जात नाही. गौतमदादांच्या मनात नाटक ठरतं आणि त्यांना आसपासच्या लोकांमध्ये कलाकार दिसतात. भूमिकेला साजेसे कलाकार हेरून त्यांना आमंत्रण जातं आणि तालीम सुरु होते. परंतु मराठी मंडळाकडून नाटकाची जाहिरात प्रकाशित होईपर्यंत "कोणतं नाटक?", "कोण कलाकार?" यापैकी काहीही गोष्टी नाटक टीमबाहेरच्या जगाला समजत नाहीत.

स्किटमध्ये काम केल्यावर स्टेजवर काम करायची माझी इच्छा होतीच. त्यामुळे एकदा नोव्हेंबर मध्ये मी अंदाज घेत घेत गौतमदादांना नाटकाबद्दल विचारलं आणि म्हणालो की नाटकात काही काम असेल तर सांगा. तेव्हा मला समजलं कि नाटक आधीच ठरलं होतं आणि कलाकारही फायनल झाले होते. फार खिन्न मनाने घरी आलो आणि काही दिवसातच काही अजून काही अशीच माणसं सापडली. त्यापैकी प्रत्येकाला नाटकात काम करायचं होतं असं नाही पण लहानसं स्किट करायला ही सगळीच मंडळी उत्सुक होती. आम्ही सर्वानी मिळून एक नौटंकी ग्रुप तयार केला आणि मग एक स्किट लिहून संक्रांतीला सादर केलं. विनिताला काही दिवसांनी नाटकासाठी बदली कलाकार म्हणून आमंत्रण आलं. बाकीच्या आम्ही मात्र दुधाची तहान ताकावर भागवली. काही दिवसातच शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करायचं ठरलं आणि त्यानिमित्त सादर होणाऱ्या स्किटच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची संधी मला मिळाली. शिवजयंतीच्या स्किटमध्येही मी एक भूमिका करून घेतली. संक्रांत आणि शिवजयंती अशा दोन्ही स्किटमध्ये स्टेजवर जायची हौस भागवून घेतली खरी, पण मराठी मंडळाच्या नाटकात काम करायचं मात्र राहून गेलं.

या सगळ्यांबरोबर ब्लूमिंग्टनने आम्हाला मित्रांचा गोतावळा दिला. गेल्या वर्षी आम्ही ब्लूमगावात आल्यावर गणपतीच्या सुमारास खूप नव्या ओळखी झाल्या. मग नवरात्रीच्या काळात काही जणांशी ओळख दृढ झाली आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही पाच कुटुंबांनी एकत्र भेटायचं ठरवलं. काही नव्याने आलेले आणि काही थोडे जुने असे असलेल्या आमची ही एक सहज साधी भेट होती. आमच्यापैकी सुशील आणि अनुजा ब्लूमगावात अनेक वर्षे राहिलेले तर अण्वेश आणि वल्लरी हे आमच्या आधी काही आठवडे गावात आलेले. योगेश-सीमा आणि हितेश-स्मिता हे गावात अगदी जुने नसले तरी आमच्यापेक्षा ब्लूमगावचे दोन पावसाळे जास्त पाहिलेले (ब्लूमिंग्टनची थंडी बघता खरंतर थंडीचे दोन मोसम जासत पाहिलेले असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल). पण या एका भेटीत बंध असे जुळून आले की जणू काही आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असू. त्यानंतर आम्ही नियमितपणे एकत्र भेटू लागलो. कधी कुणाचा वाढदिवस म्हणून तर कधी एखादी लहानशी सहल म्हणून, तर कधी उगाचच कसल्याही कारणाशिवाय. तसं पाहिलं तर अशी अनेक माणसं आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे ओळखतो, त्यांच्याकडे जाणंयेणंही असतं पण त्यांच्यासोबतचं नातं त्यापुढे सरकत नाही. पण या ब्लूमगावकरांसोबत एका वर्षात एवढे मिसळून गेलो की विचारता सोय नाही. या लोकांनी न मागता आम्हाला भरभरून दिलं. एवढं की त्याचं काही मोजमाप करता येणार नाही.

ब्लूमिंग्टनला आल्यापासून वर्षभरातच पायाला लागलेली भिंगरी पुन्हा एकदा फिरली आणि आम्हांला ब्लूमिंग्टन सोडावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. ब्लूमिंग्टनमधेच राहून नव्या प्रोजेक्टवर काम करता आले तर बघ असा आपुलकीचा सल्लाही काही जणांनी दिला. त्यानुसार मी काही प्रयत्न करून पहिलेही. पण आपण ज्या देशात असू तिथल्या सरकारचे कायदे तर पाळावेच लागणार. शेवटी आम्ही इथे येताना, ज्या शहरात काम त्या शहरात मुक्काम अशा धोरणाखालीच आलो आहोत. त्यामुळे ब्लूमगाव सोडावे लागले. मनाची तयारी होत नव्हती आणि आता जायचेच आहे तर शक्य तितक्या उशिरा जावे असेही वाटत होते.

ब्लूमिंग्टन सोडायच्या आधीचे २ आठवडे अनेक मित्र-आप्तेष्टांनी आम्हाला संध्याकाळच्या जेवणाचे निमंत्रण दिले आणि आम्ही वार लावल्यासारखे रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जेवायला जाऊ लागलो. यावेळी होणाऱ्या गप्पांना एकमेकांपासून लांब जाण्याच्या जाणिवेचा बॅकड्रॉप होता. भेटून चांगलं वाटत होतंच पण या भेटींना "पुन्हा कधी भेट होईल माहित नाही" अशा निराशेशी झालरही होती. अखेरीस आमचा ब्लूमिंग्टन सोडायचा दिवस आला. घरचे सामान आधीच पाठवून दिले होते. त्यामुळे आठवड्यासाठी लागणारे साहित्य सोबत ठेवून आम्ही निघायचे ठरवले. सकाळी १० वाजता निघायचं ठरवलं पण पाय निघेना. सकाळी सगळे ब्रेकफास्टला एकत्र जमलो आणि मग अजून काही मित्रांनीही निरोप देण्यासाठी हजेरी लावली. आजचा एक दिवस रहा आणि उद्या निघा अशीही गळ घातली गेली. पण चोवीस तासानंतरही निरोप घेताना परिस्थिती तीच असणार होती. त्यामुळे मनाचा हिय्या केला आणि ठरल्या वेळेपेक्षा ३ तास उशिराने आम्ही अटलांटाला जाण्यासाठी गाडीत बसलो.

माझं जन्मगाव खेड आणि त्यानंतर शाळा कॉलेजच्या निमित्ताने जिथे राहिलो ते रत्नागिरी सोडलं तर इतर दुसऱ्या कुठल्याही गावापेक्षा ब्लूमिंग्टनने आम्हाला सर्वात जास्त लळा लावला. पण कोणत्या म्युन्सिपालिटीचं पाण्याचं बिल कोणी किती दिवस भरायचं हेही नशिबाने आधीच लिहिलेलं असतं. त्यानुसार ब्लूमिंग्टनमधील शेवटचं पाण्याचं बिल भरलं आणि आणि त्यातलंच थोडंसं पाणी डोळ्यात ठेऊन आम्ही ब्लूमिंग्टनचा निरोप घेतला.

7 comments: