गेली काही दशके महाराष्ट्रातील राजकारणावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फार मोठा प्रभाव राहिला आहे. कम्युनिस्ट, समाजवादी आणि जनता दल हळूहळू निष्प्रभ होत असताना महाराष्ट्रातील काँग्रेसविरोधी राजकारणाचा अवकाश शिवसेनेने व्यापून टाकला. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात रामजन्मभूमी आंदोलन उग्र होत गेले आणि याच सुमारास हिंदुत्वाचा धागा पकडून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी युती केली. सेनेच्या वाढत्या प्रभावासोबतच बाळासाहेबांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला एक वलय प्राप्त झाले. पुढे १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यापर्यंत मजल मारली आणि शिवसेनेचे श्री.मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. सरकारचा सारा कारभार बाळासाहेबांच्या आदेशावरून होत असल्याने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान जरी वर्ष बांगला असले तरी त्यांचा रिमोट मातोश्रीवर असे. भाजपचे तसेच विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेही मसलती करण्यासाठी मातोश्रीवरच येत असत. त्यामुळे मातोश्रीचे स्थानमाहात्म्य युती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले.
मातोश्रीवर येणारी प्रत्येक बडी असामी मातोश्री या वास्तूसाठी नव्हे, तर शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असलेल्या आदरापोटी भेटायला येत असे. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनीदेखील बाळासाहेबांवरील प्रेमामुळे असेल किंवा आणखी कशामुळे असेल, पण हे मातोश्री माहात्म्य मान्य केले होते. वाजपेयी-आडवाणी असोत किंवा मोदी-शहा, सगळ्यांनीच मातोश्रीवर हजेरी लावली आहे. भेट हवी असेल तर मातोश्रीवर या असले आदेश बाळासाहेबांना कधी काढावे लागले नाहीत.
"मातोश्रीचे माहात्म्य हे मातोश्रीचे स्वतःचे नव्हते तर ते बाळासाहेबांचे माहात्म्य होते."
आणि हेच सत्य गेल्या काही वर्षात शिवसेनेचे नेतृत्वाने समजून घेतले नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षात "चर्चा करायची असेल तर मातोश्रीवर या" असे भाजपच्या नेत्यांना श्री. उद्धव ठाकरे आणि श्री. संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आल्याचे आपण पहिले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी युती मोडली. सगळे पक्ष आपापल्या ताकदीवर लढले पण बहुमत कोणालाही मिळाले नाही. तत्कालीन परिस्थिती अशी झाली की सेना आणि भाजपाला एकत्र यावे लागले. यंदा लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा युती झाली आणि लोकसभेनंतर विधानसभेलाही युतीला बहुमत मिळाले. पण इथे मुख्यमंत्रीपद हा अडचणीचा मुद्दा झाला. शिवसेनेच्या मते अडीच-अडीच वर्षे पद वाटून घ्यायचे ठरले होते. तर भाजपचे म्हणणे असे कि असा कोणताही निर्णय झाला नाही. अर्थात, बंद खोलीत झालेल्या आणि साक्षीदार नसलेल्या चर्चेत नक्की काय ठरले हे आपल्याला समजायला काहीही मार्ग नाही.
दोन्ही पक्षांनी हा मुद्दा एकमेकांवर दबाव आणण्यासाठी ताणून धरला. तो एवढा ताणला गेला कि आता माघार घेणे कठीण होऊन बसले. अगदी हिंदुत्व किंवा महाराष्ट्राचे हीत यासाठी एकत्र येतो आहोत असे म्हणायची पण सोय राहिली नाही. पर्यायांची शोध सुरु झाली, चर्चा आणि भेटीगाठींच्या फैरी झडाल्या आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. पण यावेळी एक गोष्ट नेहमीपेक्षा वेगळी घडली. चर्चा करण्यासाठी नव्या मित्रपक्षातला वरिष्ठ सोडाच, पण कनिष्ठ पातळीवरचा
नेताही मातोश्रीवर फिरकला नाही. याउलट संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनाच पवारांचे सिल्वर ओक, सोनियांचे दिल्लीतील १० जनपथ आणि मुंबईतील अनेक हॉटेलांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. आता नव्या सरकारला एक नव्हे तर दोन रिमोट कंट्रोल असतील पण त्यापैकी एकही मातोश्रीवर नसेल. मातोश्रीच्या वारसांनीच मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्रीचे माहात्म्य खर्च केले आहे.
गेली तीन दशके भाजप हाच शिवसेनेचा मित्रपक्ष होता. आता मित्र म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कसे असतील हे येणार काळच ठरवेल. माझ्या मते भाजप हा सांभाळायला सोपा असलेला मित्र होता. भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असतानाही "सामना"मधून वाट्टेल तशी टीका करता येत होती. अगदी, राहुल गांधींनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना प्रमाण मानून "चौकीदार चोर है" असेही म्हणता येत होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आरोप करताना "शाहिस्तेखानाची स्वारी" असेही म्हणायची मुभा होती. आता नव्या मित्रांसोबत हे स्वातंत्र्य शिवसेनेला असेल काय? ज्याला कसलाही आधार नाही अशा गोष्टीत "चौकीदार चोर है" असे छापणाऱ्यांनी "जामिनावर मोकळे असणारे सोनिया आणि राहुल" हे उघड सत्य एकदा छापून दाखवावे. किंवा आरेमधील झाडांची काळजी करताना "लवासा उभे करताना निसर्गाची हानी झाली" हेही बोलून दाखवावे. मैत्रीत थोडीशी तडजोड करावीच लागते. नवे सरकार स्थापन झाल्यावर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब" असा वर्षानुवर्षे चालत आलेला उल्लेख टाळून तो "वंदनीय बाळासाहेब" असा करावा लागला हे नव्या मित्राला वाईट वाटू नये म्हणूनच असावे.
असो, श्री. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना "शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवेन" असा शब्द दिला होता आणि त्यांनीं तो येन केन प्रकारेण पूर्ण केला आहे. त्यांच्या रूपाने एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशी वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच विरोधी पक्षनेतेपदी बसण्यास सेनेने भाग पडले आहे. शरद पवारांनी या वयात ज्या धडाडीने काम केले त्याबद्दल त्यांचेही कौतुक केले पाहिजे. तसेच स्वतः काहीही न करता, इतरांच्या कर्माने आणि परिस्थितीने कृपा केल्याने ज्यांना सरकारमध्ये बसायची संधी मिळाली त्या काँग्रेसचेही विशेष अभिनंदन करण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाला लवकरच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक चिंतन शिबीर करावे लागेल. निष्ठावंतांना डावलून केलेली खोगीरभरती, राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे झालेले दुर्लक्ष, बंडखोरीमुळे झालेले नुकसान, स्थानिक मुद्द्यांवर भर देण्याची गरज अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायला हवी. अर्थात, भाजपने निराश व्हायची गरज नाही. आजही महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे. त्यांनी आता जनमानसाची जाण असलेल्या वरिष्ठ नेत्यांचे आणि संघाचे मार्गदर्शन घेऊन पुढील उपाययोजना ठरवली पाहिजे.
थोडक्यात सांगायचे तर मातोश्रीचे माहात्म्य खर्च करून सेनेने मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. मित्राला विरोध करता येण्याचे स्वातंत्र्य किती आहे हे लवकरच दिसेल. नव्या मित्रांसोबत सेनेचा संसार सुखाने चालावा आणि त्यायोगे राज्याचे आणि पर्यायाने देशाचे हित साधले जावे हीच सदिच्छा. अर्थात, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो. जर उद्या सेनेचे नव्या मित्रांशी काही कारणास्तव बिनसले आणि मग जुन्या मित्राला जवळ करायची वेळ आली, तर "चर्चा करायची असेल तर मातोश्रीवर या" असे आता सांगता येईल का? की झक मारत दिल्ली किंवा नागपूर गाठावे लागेल?













